वसमत रेल्वे स्टेशन परिसरात कायमस्वरूपी पोलीस चौकी ची मागणी

वसमत (इसाक पठाण)
वसमत शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे स्थानिक नागरिक व रेल्वे प्रवाश्यांनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या ठिकाणी कायमस्वरूपी पोलिस चौकी स्थापन करण्याची मागणी स्थानिक नागरिक व रेल्वे प्रवाशांसह पत्रकार मोईन कादरी यांनी केली आहे.
वसमत रेल्वे स्टेशन हे शहराबाहेर असल्यामुळे रात्रीच्या वेळेस, विशेषतः रात्री नऊ नंतर, या परिसरात लुटमारी सारख्या घटना घडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमुळे नागरिक व रेल्वे प्रवासी असुरक्षित वाटत असल्याचे चित्र आहे. परिणामी, अपरात्री रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांना गावात जाण्यास धाडस होत नाही.
सध्या पोलिस गस्त पथकाकडून नियमित गस्त घालण्यात येत असली तरी, गस्तीची गाडी एका ठिकाणी जास्त वेळ थांबू शकत नसल्याने या समस्येवर प्रभावी तोडगा निघत नाही, अशी नागरिकांची तक्रार आहे.
दरम्यान, या परिसरात महादेव मंदिर, ईदगाह, चिमनशाहा वली यांची दर्गा, शीख बांधवांचे ऐतिहासिक गुरुद्वारा दमदमा साहेब, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आणि बौद्ध विहार असल्यामुळे येथे नागरिक व भाविकांची सतत वर्दळ असते. विविध धर्मीय स्थळांच्या उपस्थितीमुळे हा परिसर सामाजिक व धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो.
या पार्श्वभूमीवर सुरक्षेततेच्या दृष्टीने रेल्वे स्टेशन चौकात कायमस्वरूपी पोलिस चौकी स्थापन करून गुन्हेगारीवर आळा घालावा, तसेच भाविक व प्रवाशांच्या सुरक्षिततेची खात्री करावी, अशी मागणी केली आहे. पोलिस अधीक्षकांनी याकडे लक्ष देऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी विनंतीही स्थानिकांनी केली आहे.
नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही मागणी अत्यंत रास्त व महत्त्वाची असून, प्रशासनाने यावर सकारात्मक निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

