भूमी अभिलेख उपसंचालक कार्यालय नांदेड येथे स्थापन करण्याची मागणी..
शरीफ आलम
भूमी अभिलेख विभागाचे प्रस्तावित उपसंचालक कार्यालय लातूरऐवजी नांदेड येथे स्थापन करण्यात यावे, या मागणीसाठी हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघ व जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना राहूल गुप्ता जिल्हाधिकारी, हिंगोली यांच्या मार्फत निवेदन पाठविण्यात आले आहे. सध्या भूमी अभिलेख विभागाचे विभागीय कार्यालय छ. संभाजीनगर येथे कार्यरत असून त्याचे विभाजन करून लातूर येथे उपसंचालक कार्यालय स्थापन करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती मिळत आहे. मात्र या निर्णयामुळे हिंगोली.परभणी. नांदेड या तीन जिल्ह्यांतील शेतकरी.व्यापारी.उद्योजक व सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक व प्रशासकीय गैरसोय होणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.हिंगोली ते लातूर अंतर सुमारे २०० कि.मी.असून नांदेड हे केवळ सुमारे ८० कि.मी. अंतरावर आहे.परभणी ते नांदेड अंतर सुमारे ७० कि.मी. असून छत्रपती संभाजीनगर सुमारे १६० कि.मी. अंतरावर आहे. त्यामुळे लातूर येथे कार्यालय झाल्यास नागरिकांना प्रवास खर्च, वेळेचा अपव्यय आणि प्रशासकीय दिरंगाईचा अतिरिक्त ताण सहन करावा लागेल, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.नांदेड हे भौगोलिकदृष्ट्या मध्यवर्ती ठिकाण असून रेल्वे व रस्ते संपर्काच्या दृष्टीने अधिक सक्षम आहे. त्यामुळे उपसंचालक कार्यालय नांदेड येथे स्थापन केल्यास हिंगोली, परभणी व नांदेड जिल्ह्यांतील लाखो नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असा ठाम विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.निर्णय अंतिम होण्यापूर्वी या विषयावर पुनर्विचार करून नांदेड येथेच भूमी अभिलेख उपसंचालक कार्यालय स्थापन करण्याचे आदेश द्यावेत.अशी सामूहिक मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. महसूल मंत्री सकारात्मक निर्णय घेतील, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.सदर निवेदनावर जिल्हा अध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल, राज्य उपाध्यक्ष अनिल नैनवाणी, जिल्हा उपाध्यक्ष राजेश बगडिया, तालुकाध्यक्ष संजय देवडा, शहराध्यक्ष सुमित चौधरी, कार्याध्यक्ष वसंत भट्ट, शिवाजी मेटकर,जिल्हाध्यक्ष प्रद्युघ्न गिरिकर,जगजीत खुराणा, गजेंद्र बियाणी, सौरभ साकळे, चंदू वैद्य यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

