google.com, pub-7118703508047978, DIRECT, f08c47fec0942fa0
ताज्या घडामोडी

नांदेडच्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये एंडोस्कोपी कार्यशाळेचे आयोजन

नांदेड:- (इसाक पठाण)

गॅलक्सी हॉस्पिटल नांदेडमध्ये मराठवाडा आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांतील पचनसंस्थाविकार तज्ज्ञांची दोन दिवसीय एंडोस्कोपी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून विशेषतः यात हैदराबादच्या ए आय जी हॉस्पिटलची टीम सहभागी होणार आहे.

 

आजमितीस भारतदेशात जवळजवळ ५००० पचनसंस्थाविकार तज्ज्ञ आणि पचनसंस्थेची एंडोस्कोपी करणारे एमएस जनरल किंवा सुपरस्पेशालिस्ट सर्जन्स आहेत. एंडोस्कोपी करण्याच्या दुर्बिणी तयार करणाऱ्या काही आंतरराष्ट्रीय कंपन्या आहेत आणि या दुर्बिणींचे असंख्य प्रकार आहेत. जसे गाड्यांचे, मोबाईल फोन्सचे, किंवा कॅमेऱ्याचे खालपासून वरपर्यंत अनेक प्रकार आहेत, अगदी तसेच प्रकार पचनसंस्थेचा मार्गाची तपासणी करणाऱ्या दुर्बिणींचे देखील आहेत. तुमच्या खिशात जितके पैसे तितकी महागडी किंवा जास्त पॉवरची दुर्बीण उपलब्ध आहे. या सर्वांचा उद्देश गंभीर आजारांचे निदान लवकरात लवकर करून जीवनमान आणि जगण्याचा दर्जा वाढविणे हा आहे.

डॉक्टरांचाही असाच प्रकार आहे. सरकारी वैद्यकीय महाविद्यालये , खासगी महाविद्यालये, खासगी उच्च कोटीची रुग्णालये, बाहेरच्या देशांत पैसे भरून त्या भाषेत शिक्षण घेणे आणि मग आपल्या देशात येऊन इथली एक एंट्रन्स परीक्षा देऊन प्रॅक्टिस करणे पासून काही स्वायत्त संस्था ज्यात पैसे भरून डिग्री मिळवून काम करणारे सर्वच डॉक्टर्स आज समाजात कार्यरत आहेत. मग त्यातही डिग्री वेगळी डिप्लोमा वेगळा, फेलोशिप वेगळी आणि २-४ आठवडे निरीक्षण कोर्स करून रुग्णसेवा देणारे तज्ज्ञ डॉक्टर वेगळे.

मात्र रुग्णांसाठी डॉक्टर हा ‘डॉक्टर’ असतो..

या सगळ्या गोष्टींचा ऊहापोह करण्याचा उद्देश सामान्यजणांना जाणीव करून देणे हा आहे.

 

*२६ जानेवारी २०२६ रोजी नांदेडच्या गॅलक्सी पचनसंस्था आणि एंडोस्कोपी रुग्णालयाला १० वर्षे पूर्ण होत आहेत*. या दहा वर्षांत या रुग्णालयाने नांदेड वैद्यकीय परिक्षेत्रात सर्व प्रकारच्या दुर्बिणी आणि सेवा सुविधा समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवल्या आहेत.

*येत्या ३ आणि ४ जानेवारी २०२६ रोजी* या रुग्णालयात मराठवाडा, सोलापूर, यवतमाळ आणि तेलंगणातील निजामाबाद या जिल्ह्यांतील सर्व पचनसंस्थाविकार तज्ज्ञ आणि एंडोस्कोपी तज्ज्ञांची एक कार्यशाळा आयोजित करीत आहे. याचा मुख्य उद्देश सर्व डॉक्टरांनी एकाच प्रकारची वैद्यकीय उपचार पद्धती अवलंबून एकसूत्र पद्धती विकसित करावी हा आहे. *यासाठी हैदराबादच्या एआयजी हॉस्पिटल्सचे एंडोस्कोपी विभागाचे डायरेक्टर डॉ मोहन रामचंदानी, डॉ जहीर नबी आणि त्यांच्यासोबत असणारे या विषयाचे तज्ज्ञ डॉ हार्दिक रुगवाणी आणि डॉ. इनावोलू प्रदेव हे येत आहेत*. दोन दिवस चालणाऱ्या या कार्यशाळेचे आयोजन “गॅलक्सी हेल्थकेअर फाऊंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट नांदेड” द्वारा करण्यात आले आहे. ही कार्यशाळा गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये पार पाडली जाणार आहे.

याच कार्यशाळेत गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये जगात आजवर उपलब्ध असणारी पचनसंस्थेच्या मार्गाची अचूक तपासणी आणि उपचार करणारी ऑलिम्पस या जपानी कंपनीने निर्मिलेली दुर्बीण GIF XZ 1200 याचे लोकार्पण करण्यात येईल. म्हणजे या दुर्बिणीची निरीक्षण क्षमता १२५ X ऑप्टिकल झूम इतकी आहे. याला “झूम एंडोस्कोपी” असेही म्हणतात. या दुर्बिणीतून एक पेशी १२५ पट मोठी करून पाहता येते जेणेकरून आजाराचे निदान त्वरित होण्यास मदत होईल. मराठवाड्यात ही दुर्बीण उपलब्ध करणारे गॅलक्सी हे एकमेव आणि पहिलेच रुग्णालय आहे.

डॉ . जोशी नुकतेच जपानला जाऊन आठवडाभर प्रशिक्षण घेऊन आले. १९४५ ला अणुबॉम्बने संपूर्ण उध्वस्त झालेल्या देशात, जठराचा कॅन्सर जगात सर्वाधिक होता. आज जपान देशात कॅन्सरचे उपचार प्राथमिक ( पहिल्याच स्टेजमध्ये) होतात याचे एकमेव मुख्य कारण म्हणजे लवकर निदान, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि आहार आणि व्यायाम यांचे नियोजन. आपण आजार बळावल्यावर डॉक्टर शोधतोय किंवा खूप सीरियस झाल्यावर तपासण्या करतो. आपण प्रतिबंधात्मक उपाय योजनाकडे गांभीर्याने पाहत नाही. परिणामी जपानचे सरासरी आयुष्मान ८८ वर्षे आणि भारताचे ७० वर्षे इतके आहे.

प्रतिबंधात्मक उपाययोजना जर आपण वेळीच केल्या नाहीत तर आपल्या हवा पाणी आणि अन्न प्रदूषणामुळे भारत कॅन्सरची राजधानी बनेल.अशी माहिती डॉ.नितीन जोशी यांनी दिली.

Share
Back to top button