वसमतच्या उपनगराध्यक्षपदी सय्यद इमरान अली यांची बिनविरोध निवड

वसमत(इसाक पठाण)
वसमतचे लोकप्रिय आमदार राजू भैय्या नवघरे यांचे निष्ठावंत खंदे समर्थक व तरुण विकासप्रिय नगरसेवक सय्यद इमरान अली यांची वसमतच्या उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे.तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मुजीब पठाण, माजी नगर अभियंता रत्नाकर अडसिरे व अड.दिपक कट्टेकर यांची नगर परिषदेच्या स्विकृत सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
गुरुवार दिनांक १५ जानेवारी रोजी वसमत नगर परिषदेची पहिली सर्वसाधारण सभा नगराध्यक्षा सुनीता मनमोहन बाहेती यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.या सभेत राष्ट्रवादी काँग्रेस अजीत पवार गटाच्या नगरसेवक गटनेते पदी सचिन दगडू यांची तर भाजप नगरसेवक गटनेते पदी शिवदास बोड्डेवार व काँग्रेस नगरसेवक गटनेते पदी वर्षा युवराज आवटे यांची निवड करण्यात आली असल्याचे घोषित करण्यात आले या नंतर नगर परिषद उपाध्यक्ष पदासाठी निवड होणार असल्याचे घोषित करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजीत पवार गटाच्या वतीने सय्यद इमरान अली यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तर भाजपचे माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक शिवदास बोड्डेवार यांनी भाजपच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला.अश्या प्रकारे उपाध्यक्ष पदासाठी दोन अर्ज आले होते.परंतू काही वेळेनंतर भाजपचे शिवदास बोड्डेवार यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने सय्यद इमरान अली यांचा एकमेव अर्ज राहिला.त्यामुळे सय्यद इमरान अली यांची वसमतच्या उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे अध्यक्षा सुनीता मनमोहन बाहेती यांनी घोषित केले.
बिनविरोध निवड होताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करीत घोषणाबाजी करत ढोल ताशाच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी केली.
तसेच आजच्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेस अजीत पवार गटाचे शहराध्यक्ष मुजीब पठाण, राष्ट्रवादी काँग्रेस अजीत पवार गटाचे अड.दिपक कट्टेकर व वसमत शहर विकास आघाडीचे माजी नगर अभियंता रत्नाकर अडसिरे यांची स्विकृत सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली.
वसमत नगर पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एका पक्षाला बहुमत मिळाले जनतेतून थेट नगराध्यक्ष निवडला गेला तसेच एकाच पक्षाचे दोन स्विकृत सदस्य व त्या पक्षाच्याच मर्जीचा एक स्विकृत सदस्य असे तिघे ही नगर परिषदेत नियुक्त झाल्याने सताधारी राष्ट्रवादी काँग्रेस कडे नगर पालिकेची संपूर्ण सुत्रे हाती आली आहे.आता आमदार राजू भैय्या नवघरे यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्षा सुनीता मनमोहन बाहेती, उपाध्यक्ष सय्यद इमरान अली व नगरसेवक वसमतच्या सर्वांगिण विकासासाठी कोणती पावले उचलतात या कडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

