डॉ.गंगाधर काळे यांचा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते गौरव..
शरीफ आलम
हिंगोली येथील जिल्हा नियोजन समिती सभागृहात सोमवारी सार्वजनिक आरोग्य विभाग व जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित क्षयरोग मुक्त ग्रामपंचायत अभियान वर्ष 2025-26 चा गौरव सोहळा आयोजित केला होता त्यामध्ये राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल वसमत उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ गंगाधर काळे यांचा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.जिल्हाशल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ कैलास शेळके, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ वीरेंद्र जायभाये यांच्या मार्गदर्शनाखाली वसमत उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.गंगाधर काळे यांनी आपल्या प्रभावी
नेतृत्वाखाली नियोजन करीत,क्षय रोग विभागातील सुसूत्रता,समन्वय, वेळेचे काटेकोरपणे पालन, व उद्दिष्ट पूर्ती यामध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावल्यानेच हा सन्मान त्यांना मिळाला आहे. या सन्मानाविषयी बोलताना डॉ गंगाधर काळे यांनी सांगितले की क्षय रोग हा संसर्गजन्य आजार असला तरी तो पूर्णपणे प्रतिबंधित करता येतो. क्षयरोगावर शासकीय रुग्णालयात मोफत उपचार उपलब्ध आहेत. त्यामुळे तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. रुग्णांची किंमान सहा महिन्यात उपचार पूर्ण करणे आवश्यक आहे. उपचार अर्धवट सोडल्यास औषध प्रतिरोधक क्षय रोगाच्या धोका वाढतो, त्यासाठी रुग्णानी उपचारावर सातत्याने लक्ष ठेवावे, त्याचबरोबर रुग्णाबरोबर भेदभाव न करता त्यांना सहकार्य करावे ही समाजाची जबाबदारी आहे.क्षय रोग मुक्त करण्यासाठी प्रभावी प्रतिबंध,लवकर निदान व नियमित उपचार यावर लक्ष देणे आवश्यक आहे.
हा सन्मान माझा एकट्याचा नसून उपजिल्हा रुग्णालय वसमत येथील कार्यरत वैद्यकीय अधिकारी, क्षय रोग विभागातील कर्मचारी यांच्या प्रयत्नाचे फलित असल्याचे डॉ गंगाधर काळे यांनी नमूद केले. भविष्यात हीच कार्यपद्धती कायम ठेवून उपजिल्हा रुग्णालय वसमत येथील आरोग्य सेवा दर्जेदार, पारदर्शक, गतिमान व परिमाण कारक देण्याचा संकल्प यावेळी व्यक्त केला.

