वसमत विधानसभा मतदारसंघातील विकासकामांना मिळणार गती; आमदार राजू भैय्या नवघरे

वसमत: (इसाक पठाण)
वसमत विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण व शहरी भागातील प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठी आणि प्रशासकीय अडथळे दूर करण्यासाठी दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी जिल्हाधिकारी हिंगोली राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालय सभागृह, वसमत येथे महत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न झाली. आमदार चंद्रकांत उर्फ राजू भैय्या नवघरे यांनी यावेळी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत तांत्रिक बाबींवर सविस्तर चर्चा करून कामे तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या.
बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे आणि निर्णय:
मनरेगा व सिंचन विहिरी:
मनरेगा अंतर्गत सिंचन विहिरी, जनावरांचे गोठे आणि कुरण लागवडीच्या कामांना होणारा विलंब टाळून लाभार्थ्यांचे थकीत अनुदान तात्काळ जमा करण्याचे निर्देश आमदारांनी दिले. मस्टर काढण्यास होणारी दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
शहर स्वच्छता व डम्पिंग ग्राउंड:
वसमत शहराच्या स्वच्छतेसाठी डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न कळीचा ठरत आहे. यासाठी तात्काळ जागा उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार राजू नवघरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. जागा मिळताच शहराचा घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे.
आधुनिक भाजी मार्केट:शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. जुन्या गोडाऊनची जागा रिकामी करून त्या ठिकाणी ‘आधुनिक भाजी मार्केट’ उभारण्याच्या तांत्रिक बाजू पडताळून पाहण्यात आल्या. हे मार्केट लवकरच साकारणार असल्याने शहरवासीयांना मोठा दिलासा मिळणार आहे.
आधुनिक क्रीडा संकुल:
जिल्हा परिषद मैदानावरील प्रस्तावित आधुनिक क्रीडा संकुलाच्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी आमदार राजू नवघरे व जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष मैदानावर जाऊन पाहणी केली. हा प्रकल्प लवकरच पूर्णत्वास नेण्याचे आदेश त्यांनी दिले.
पर्यटन विकास (सति पांगरा तलाव):
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सतिपांग्रा तलावाची पाहणी करून त्यास ‘पर्यटन क्षेत्राचा’ दर्जा देण्याचा मानस आमदारांनी व्यक्त केला. यामुळे शहरात एक उत्तम विरंगुळा केंद्र निर्माण होईल.
सिंचन व जलसंधारण:
पूर्णा बॅरेज, सिद्धेश्वर उपसा जंक्शन, केळी पाझर तलाव आणि शिरड शहापूर तलावाच्या कामाला गती देण्याच्या सूचना देण्यात आल्या. शिरड तलावामुळे १२७ हेक्टर कोरडवाहू जमीन ओलिताखाली येणार असून शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे.
आरोग्य सेवा व डायलिसिस सेंटर:
वसमत शहरातील डायलिसिस सेंटर तातडीने कार्यान्वित व्हावे, यासाठी आमदारांनी आग्रही मागणी केली. तसेच आरोग्य विभागातील रिक्त पदे व सुविधांबाबत चर्चा करण्यात आली.
विद्युत समस्या:टाकळखोपा (ता. औंढा) येथील १३२ केव्ही केंद्राच्या कामातील अडथळे दूर करून कमी दाबाच्या वीजपुरवठ्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे निर्देश वीज विभागाला दिले.
या बैठकीला जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, उपविभागीय अधिकारी विकास माने (SDM), तहसीलदार शारदा दळवी आणि संबंधित सर्व विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
