google.com, pub-7118703508047978, DIRECT, f08c47fec0942fa0
ताज्या घडामोडी

लायन्स क्लब ऑफ बसमत प्राईड तर्फे त्रिशिवनगर येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत दप्तरांचे वाटप

संपादक:- इसाक पठाण

वसमत, :-

शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्याचा मूलभूत हक्क असून आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही विद्यार्थ्याच्या शिक्षणात अडथळा येऊ नये, या सामाजिक जाणीवेतून लायन्स क्लब ऑफ बसमत प्राईड यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, त्रिशिवनगर येथे विद्यार्थ्यांना मोफत शालेय दप्तरांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला असून पालकांनीही या समाजोपयोगी कार्याचे मनापासून स्वागत केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लायन्स क्लब ऑफ बसमत प्राईडचे अध्यक्ष लायन संजीव बेंडके होते. यावेळी क्लबचे सचिव लायन कल्याण कुरुंदकर, माजी अध्यक्ष लायन राजू सिद्दीकी, माजी सचिव लायन बाळासाहेब बेले, उपाध्यक्ष लायन गौस बागवान, लायन शेख इम्रान शेख नूर, केंद्रप्रमुख कोमलवार सर,संदीप चव्हाण सर, बिरादार मॅडम, दळवी मॅडम (कुरुंदा) तसेच शिक्षकवृंद, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना नवीन शालेय दप्तरांचे वितरण करण्यात आले. नवीन दप्तर मिळाल्याने विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना नियमित शाळेत उपस्थित राहण्याचे, मन लावून अभ्यास करण्याचे, शिस्त, स्वच्छता, वेळेचे महत्त्व आणि उत्तम संस्कार जोपासण्याचे आवाहन केले. “आजचे विद्यार्थी हे उद्याचे जबाबदार नागरिक आहेत. शिक्षणाच्या माध्यमातूनच व्यक्तिमत्त्व विकास आणि राष्ट्रनिर्मिती शक्य आहे,” असे प्रतिपादन यावेळी करण्यात आले.

यावेळी माजी सचिव बाळासाहेब बेले व लायन कल्याण कुरुंदकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “लायन्स क्लब ऑफ बसमत प्राईड हा केवळ सेवा प्रकल्प राबविणारा क्लब नसून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत मदतीचा हात पोहोचविण्यास कटिबद्ध आहे. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक जनजागृती आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट असून भविष्यातही असे विविध समाजहिताचे उपक्रम सातत्याने राबविण्यात येतील.”

शाळेच्या मुख्याध्यापक व शिक्षकांनी लायन्स क्लबच्या या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, अशा सामाजिक सहकार्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाची अधिक प्रेरणा मिळते आणि समाजात शिक्षणाविषयी सकारात्मक वातावरण निर्माण होते. त्यांनी लायन्स क्लब ऑफ बसमत प्राईडचे मनःपूर्वक आभार व्यक्त करून भविष्यातही अशाच सामाजिक उपक्रमांची अपेक्षा व्यक्त केली.

कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला. विद्यार्थी, पालक आणि उपस्थित नागरिकांनी लायन्स क्लब ऑफ बसमत प्राईडच्या या समाजाभिमुख उपक्रमाचे मुक्तकंठाने कौतुक केले.

Share
Back to top button