जवळा बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती विरोधात अविश्वास ठराव पारित
शरीफ आलम
औंढा तालुक्यातील जवळा बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजीराव भालेराव यांच्या विरुद्ध १३ संचालकांनी दाखल केलेल्या अविश्वास ठराव आज सोमवार दिनांक २ मार्च रोजी तेरा मतांनी पारित करण्यात आला.
कृषी उत्पन्न बाजार समितीची सण२०२३-२०२८ या कालावधीची निवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू नवघरे यांचे आठ संचालक तर शिवसेनेचे माजी मंत्री डॉ जयप्रकाश मुंदडा यांचे आठ संचालक तसेच भाजपचे दोन संचालक निवडणूआले होते. यावेळी आमदार राजू नवघरे आणि डॉ जयप्रकाश मुंदडा यांच्यात अडीच वर्ष शिवसेनेचा तर अडीच वर्ष राष्ट्रवादीचा सभापती निवडण्याचे अलिखित करार झाला होता. या अनुषंगाने पहीले अडीच वर्ष शिवसेनेचे शिवाजी भालेराव यांची सभापती म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली होती. तसेच उपसभापती म्हणून राष्ट्रवादीचे बबनराव राखुंडे यांची निवड करण्यात आली होती.अडीच वर्षाच्या कालावधी संपल्यानंतर राष्ट्रवादीच्या संचालकांनी आमदार राजु नवघरे यांच्याकडे सभापतीपद निवडीची मागणी केली.यावेळी सभापती भालेराव यांना राजीनामा देण्याचे कळविण्यात आले होते. मात्र भालेराव यांनी राजीनामा देण्यास नकार दिल्यामुळे ९फेब्रुवारी२०२६ रोजी उपसभापती बबनराव राखुंडे यांच्या सहीत तेरा संचालकांनी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडे सभापती शिवाजी भालेराव यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी यांनी याप्रकरणी 13 फेब्रुवारी रोजी वसमत तहसील कार्यालयात तहसीलदार शारदा दळवी यांच्या अध्यक्षतेखाली अविश्वास ठरावावर चर्चा करण्याचे आदेश दिले होते. मात्र सभापती शिवाजी भालेराव यांनी या आदेशाला महाराष्ट्र राज्य पणन संचालक पुणे येथे आव्हान देत याचिका दाखल केली. यावर सुनावणी होऊन पणनसंचालक संजय कदम यांनी सभापतींच्या अविश्वास ठरवला 18 फेब्रुवारी पर्यंत स्थगिती दिली होती.18 फेब्रुवारी रोजी झालेल्या पुढील सुनावणीत सदर स्थगिती उठविण्यात आली.यानंतर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी एक मार्च रोजी उपविभागीय अधिकारी विकास माने यांच्या अध्यक्षतेखाली वसमत तहसील कार्यालयात अविश्वास ठरावावर चर्चा करण्याचे आदेश दिले. होते.जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला वरून सोमवारी २ मार्च रोजी उपविभागीय अधिकारी विकास माने यांच्या अध्यक्षतेखाली वसमत तहसील कार्यालयात अविश्वास ठरावावर चर्चा करण्यासाठी बैठक घेण्यात आली यावेळी जवळा बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी भालेराव यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे आठ आणि शिवसेनेचे पाच अशा तेरा संचालकांनी हातवर करून अविश्वासाच्या बाजूने मतदान केले तर भाजपचे अंकुश आहेर आणि श्रीराम सोमानी या दोन संचालकांनी तटस्थ भूमिका नोंदवली .तर सभापती शिवाजीराव भालेरावसह तीन संचालक अनुपस्थित होते.यावेळी सभापती शिवाजी भालेराव यांच्या विरोधात तेरा मतांनी अविश्वास ठराव पारित करण्यात आला.
सभापती विरोधात अविश्वास ठराव संमत झाल्यानंतर संचालकांनी आनंद व्यक्त करीत एकच जल्लोष केला.त्यानंतर सर्व संचालकांनी विश्राम गृहात जाऊन आमदार राजू नवघरे यांची भेट घेतली.यावेळी वसमत विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभापती शिवाजीराव भालेराव यांच्या विरुद्ध आलेला अविश्वास ठराव बहुमताने मंजूर झाला आता नवीन सभापती कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

