42.5 डिग्री सेल्सिअस तापमानात मांडवी येथे 124 वे एंडोस्कोपी शिबिर संपन्न 17 आदिवासी समाजाच्या रुग्णांची एंडोस्कोपी
नांदेड:-(इसाक पठाण)
सध्या 42.5 डिग्री सेल्सिअस तापमान असताना सुद्धा रुग्णां विषयी आपली बांधिलकी जपत नांदेड येथील ग्लोबल हॉस्पिटलचे पोट विकार तज्ञ डॉ नितीन जोशी यांनी मांडवी सारख्या दुर्गम भागात एंडोस्कोपी शिबिर आयोजित करून 17 आदिवासी समाजाच्या रुग्णांची यशस्वीरित्या एंडोस्कोपी केली

रविवार दिनांक 19 एप्रिल 2026 म्हणजेच वैज्ञानिक दृष्ट्या “जागतिक यकृत दिवस” आणि सांस्कृतिक व आध्यात्मिक दृष्ट्या अक्षयतृतीया, परशुराम जयंती आणि बसवेश्वर जयंती या अत्यंत शुभ मुहूर्तावर गॅलक्सी हेल्थकेअर ची टीम 42.5 डिग्री सेल्सिअस तपतपत्या उन्हात नांदेड जिल्ह्यातल्या आदिवासी भागात असलेल्या मांडवी या गावात पोहोचली. हा फिरत्या एंडोस्कोपी रुग्णालयाचा 124 वा कॅम्प होता. डॉक्टर्स असोसिएशन मांडवी यांच्या सहकार्याने, आदिवासी सांस्कृतिक भवन मांडवी येथे हे 124 वे शिबिर संपन्न झाले. विशेष बाब म्हणजे या शिबिराचे उद्घाटन मांडवी गावचे सरपंच सौ. सुमनबाई पेंदोर, डॉक्टर असोसिएशन मांडवी चे अध्यक्ष डॉ. मणीराम चव्हाण, डॉ. संजय सामावार, डॉ. मोहन राठोड, डॉ. जयदीप राठोड आणि या शिबिराचे संयोजक डॉ. शिवाजी काळे या सर्वांच्या उपस्थितीत झाले. मांडवी सारख्या आदिवासी गावात एकूण 18 रुग्णांनी एंडोस्कोपीसाठी आपले नाव नोंदणी केली होती यापैकी 17 रुग्णांची एंडोस्कोपी करण्यात आली तर इतर आलेल्या एकूण 5 रुग्णांना औषधोपचार देऊन हे शिबिर संपन्न झाले. या शिबिरासाठी गॅलेक्सी हेल्थकेअर फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट नांदेड आणि गॅलेक्सी हॉस्पिटल नांदेडची एकूण 9 जणांची टीम आदल्या दिवशी रात्रीच माहूर मुक्कामी पोचली होती. 42.5 डिग्री सेल्सिअस तापमानात टीमने सकाळी साडेआठ वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत अविरत काम केले. या शिबिरात डॉ. संदीप दरबस्तवार ( लॅप्रोस्कोपिक सर्जन), एंडोस्कोपी तंत्रज्ञ गोविंद वाघमारे, अमजद शेख, आदित्य कुलकर्णी, फार्मासिस्ट – शिवानंद शिरगिरे आणि पॅथॉलॉजी तंत्रज्ञ इमरान शेख आणि सुमित यांची उपस्थिती होती. जिथे कोणी नाही तिथे आम्ही हे ब्रीद घेऊन काम करणारी ही टीम रुग्णसेवक म्हणून तत्पर असल्याने नागरीकात त्यांच्या या कार्याचे कौतुक केले जात आहे.
