google.com, pub-7118703508047978, DIRECT, f08c47fec0942fa0
ताज्या घडामोडी

*डॉ नितीन जोशी यांच्या गॅलक्सी हास्पिटल नांदेडचा फिरते एंडोस्कोपी रुग्णालयाचा यशस्वी उपक्रम * माहूरगड येथे फिरते एंडोस्कोपी रुग्णालयाचे 125 वे शिबिर संपन्न

नांदेड (इसाक पठाण)

रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून गेली अनेक वर्षे ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांसाठी कार्यरत असलेले गॅलक्सी हॉस्पिटल, नांदेडचे फिरते एंडोस्कोपी रुग्णालयाने आपल्या सेवायात्रेतील एक महत्त्वाचा टप्पा गाठत माहूरगड येथे १२५ वे शिबिर यशस्वीपणे पूर्ण करण्यात यशस्वी झाले.

माहूरगड येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात आयोजित शिबिरात एकूण २० रुग्णांची तपासणी, आवश्यक रक्त चाचण्या आणि अत्याधुनिक NBI (Narrow Band Imaging) तंत्रज्ञानाद्वारे तोंडा द्वारे एंडोस्कोपी करण्यात आली.

या शिबिरासाठी नांदेड जिल्ह्यासह शेजारच्या लातूर जिल्ह्यातील अनेक रुग्णांनी उपस्थिती लावली. विशेषतः महिलांचा सहभाग लक्षणीय होता. ग्रामीण भागातील नागरिकांना शहरात येऊन महागडी तपासणी करण्याची गरज भासू नये, या उद्देशाने फिरते एंडोस्कोपी रुग्णालय सातत्याने गावोगावी पोहोचत आहे.

माहूरगड येथील शिबिरातील महत्त्वपूर्ण निष्कर्ष:-

एंडोस्कोपी तपासणी दरम्यान काही गंभीर आजारांचे निदान ही झाले.

* एका रुग्णाच्या अन्ननलिकेत कॅन्सर ची गाठ आढळून आली.

* दोन तरुण रुग्णांमध्ये इसोफेजियल व्हॅरिसेस (अन्ननलिकेतील सूजलेल्या रक्तवाहिन्या) निदर्शनास आल्या.

* एका रुग्णाच्या जठरात आणि लहान आतड्यात जखमा (अल्सर्स) आढळून आल्या.

ही निदाने योग्य वेळी झाल्यामुळे संबंधित रुग्णांना पुढील उपचारांसाठी तातडीने मार्गदर्शन करण्यात आले. अनेकदा पोटदुखी, अॅसिडिटी, उलट्या, वजन घटणे किंवा गिळताना त्रास यांसारखी लक्षणे दुर्लक्षित केली जातात. मात्र योग्य वेळी एंडोस्कोपी केल्यास गंभीर आजारांचे लवकर निदान होऊन जीव वाचू शकतो, याची आजच्या शिबिराने पुन्हा एकदा प्रचिती दिली.

रुग्णसेवेपुढे अन्नदानाची जोड

आजच्या शिबिराचे आणखी एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे “आपलं पोट आपल्या हातात” या संकल्पनेतून झालेले अन्नदान.

मुखेड येथील सुप्रसिद्ध केटरर शिवानंद बंडे यांनी स्वखर्चाने आणि सेवाभावातून एंडोस्कोपी झालेल्या सर्व रुग्णांसाठी गरमागरम खिचडी आणि थंड पाण्याच्या बाटल्यांची व्यवस्था केली. एंडोस्कोपीसाठी आलेले रुग्ण अनेकदा उपाशीपोटी येतात. तपासणीनंतर त्यांना पौष्टिक आहार मिळणे हीदेखील उपचार प्रक्रियेतील महत्त्वाची बाब असते.

रुग्णांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य पाहून अन्नदानाचे खरे महत्त्व अधोरेखित झाले. वैद्यकीय सेवेबरोबरच मानवी संवेदनांची जोड मिळाल्यास उपचार अधिक अर्थपूर्ण होतात, याचे हे सुंदर उदाहरण ठरले.

सेवेतून समाधान:-

कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचे लवकर निदान, ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत अत्याधुनिक तपासणी पोहोचविणे, रुग्णांना पुढील उपचारांसाठी मार्गदर्शन करणे आणि त्यानंतर अन्नदानाद्वारे त्यांच्या गरजांची काळजी घेणे—या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक आरोग्यसेवा.

गॅलक्सी हॉस्पिटल, नांदेडची संपूर्ण टीम स्वतःला भाग्यवान समजत असेल की अशा प्रकारची सेवा करण्याची संधी समाजाने त्यांना दिली. माहूरगड येथील १२५ वे शिबिर हे केवळ एक आकडा नसून शेकडो कुटुंबांच्या आरोग्याची, विश्वासाची आणि सामाजिक बांधिलकीची कहाणी आहे.

रुग्णसेवा, अन्नदान आणि जनजागृती यांचा हा प्रवास पुढेही अशाच निष्ठेने सुरू राहील, हीच आजच्या शिबिरातून मिळालेली प्रेरणा आहे डॉ. नितीन जोशीफिरते एंडोस्कोपी रुग्णालय, गॅलक्सी हॉस्पिटल, नांदेड यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले आहे.

Share
Back to top button