google.com, pub-7118703508047978, DIRECT, f08c47fec0942fa0
ताज्या घडामोडी

किडनी प्रत्यारोपण पूर्णपणे निःशुल्क करा रुग्ण हक्क संघर्ष समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष मोईन कादरी यांची मागणी

वसमत (इसाक पठाण)

महाराष्ट्रासह देशभरातील किडनी रुग्णांना दिलासा देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने किडनी प्रत्यारोपण पूर्णपणे निःशुल्क करण्याची मागणी रुग्ण हक्क संघर्ष समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष मोईन कादरी यांनी सरकारकडे केली आहे.

किडनी विकाराने त्रस्त असलेल्या लाखो रुग्णांसाठी किडनी प्रत्यारोपण (Renal/Kidney Transplant) ही जीवनदायी उपचारपद्धती आहे. मात्र प्रत्यारोपणासाठी लागणारा सुमारे ७ ते ९ लाख रुपयांचा खर्च अनेक गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी परवडणारा नसल्याने अनेक रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. परिणामी अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे.

सध्या महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना (MJPJAY) अंतर्गत किडनी प्रत्यारोपणाचा समावेश करण्यात आला असून पिवळे व शेंदरी रेशन कार्डधारक पात्र रुग्णांसाठी विशेष पॅकेज उपलब्ध आहे. तसेच प्रत्यारोपणाशी संबंधित काही उपचारांचा खर्चही योजनेअंतर्गत मंजूर केला जातो. तरीदेखील अनेक रुग्णांना विविध कारणांमुळे मोठा आर्थिक भार सहन करावा लागत असल्याची वस्तुस्थिती आहे.

याच पार्श्वभूमीवर रुग्ण संघर्ष समितीचे हिंगोली जिल्हा कार्याध्यक्ष मोईन कादरी यांनी किडनी प्रत्यारोपण पूर्णपणे निशुल्क करण्याची मागणी केली आहे. यासाठी ते संबंधित अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शासनाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन सादर करणार आहेत.

भारतामध्ये लाखो किडनी रुग्ण उपचारांच्या प्रतीक्षेत आहेत. आर्थिक अडचणीमुळे अनेकांना प्रत्यारोपण करता येत नाही. शासनाने किडनी प्रत्यारोपण पूर्णपणे मोफत केल्यास हजारो नव्हे तर लाखो रुग्णांचे जीव वाचू शकतात,” असे मत मोईन कादरी यांनी व्यक्त केले.

रुग्ण संघर्ष समितीच्या वतीने केंद्र आणि राज्य शासनाला आवाहन करण्यात आले आहे की, किडनी रुग्णांच्या गंभीर समस्येकडे संवेदनशीलतेने पाहून किडनी प्रत्यारोपण निशुल्क करण्याचा निर्णय तातडीने घ्यावा. ही मागणी पूर्ण होईपर्यंत जनजागृती, निवेदने आणि लोकशाही मार्गाने संघर्ष सुरू ठेवण्यात येईल, असा इशाराही समितीने दिला आहे.

देशातील सर्व किडनी रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या हिताचा विचार करून शासन सकारात्मक निर्णय घेईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Share
Back to top button